हिंगोली - पतीने सोडून दिलेल्या अन्नपूर्णाबाई धुळे या त्यांच्या दोन मतिमंद मुलासोबत राहातात. मतीमंद मुलांसोबत एकाकी राहणाऱ्या अन्नपूर्णाबाई धुळे या धाडसी महिलेची विविध प्रसार माध्यम व सोशल मीडियावरून मांडलेल्या कैफियतिची दखल घेऊन तीन ही मायलेकरांचे निराधार योजनेचे प्रस्ताव मंजूर केले असून, मुख्य म्हणजे रमाई घरकुल योजनेतुन निवड करण्यात आलीय. त्यामुळे अन्नपूर्णाबाईचे पक्क्या घराचे ही स्वप्न पूर्ण होणार आहे.
तीनही जणांचे निराधार योजनेतून प्रस्ताव मंजूर -
अन्नपूर्णा धुळे ह्या ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी आहेत. त्यांना दोन मतिमंद मुले असून, या मुलामुळे अन्नपूर्णाबाईला पतीने सोडून दिलेय. तरी देखील अन्नपूर्णा अजिबात खचून गेल्या नाहीत, काबाड कष्ट करून दोन्ही ही मतिमंद मुले लहानाची मोठी केली. गावातील बऱ्याच जणांनी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. तिची धडपड ही वाखण्याजोगी आहे. दोन मुले मतिमंद अन् घर पडके ही दयनीय अवस्था विविध प्रसार माध्यमांनी दाखविली. तोच बऱ्याच जणांनी या कुटुंबाला मदत केली. प्रशासनाला देखील पाझर फुटला अन् तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी तीनही जणांचे निराधार योजनेतून प्रस्ताव मंजूर केले आहेत. राहिलेला पक्क्या घराचा प्रश्न तो देखील आता रमाई घरकुल योजनेत निवड झाल्यामुळे सुटला आहे.