हिंगोली-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14 झाली असल्याने, प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा होत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बाजारपेठ 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता कोणताही नागरिक विना परवानगी बाहेर पडल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हिंगोलीत 3 मे पर्यंत संपूर्ण बाजारपेठा राहणार बंद; 'हे' आहे कारण
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 वर गेल्याने जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण बाजारपेठा 3 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हिंगोलीमध्ये 20 एप्रिल ते 2 मे पर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने, स्वीटस्मार्ट, बेकरी, दूध विक्री केंद्र, परवानाधारक चिकन -मटण शॉप एक दिवस आड करून सकाळी नऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते. एवढेच नव्हे तर 21 एप्रिल रोजी जिल्ह्यातील खते व बी- बियाणे विक्रीची दुकाने, कृषी सेवा केंद्र, कृषीविषयक औजारांच्या दुरुस्तीची दुकाने एक दिवस आड सुरू ठेवण्याची तसेच 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील स्टेशनरी इलेक्ट्रिकल्स दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता बोरवेल मशीन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता 28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी नवीन आदेश काढून यापूर्वीचे सर्व आदेश रद्द केले आहेत. नवीन आदेशानुसार 3 मे पर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूच्या दुकानासह सर्वच बाजार पेठा 3 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
एवढे करूनही जर विना परवानगी कोणी बाहेर आढळलेच तर त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्ह्यात सर्वत्रच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण कोणीही रस्त्यावर न फिरता घरातच राहून नागरिकाने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.