हिंगोली- जिल्ह्यातील कळमनुरी येथे प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26 जानेवारी) मुस्लीम समाज सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 27 जानेवारी) मुस्लीम समाज बांधवांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे.
मुस्लीम बांधवाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलने काढूनही सरकार यामध्ये अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. या कायद्यामुळे मुस्लिमांसह इतर समाजाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कळमनुरी येथे मुस्लीम बांधव दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले आहेत.