हिंगोली - लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले अॅड. शिवाजी जाधव यांची स्थावर व जंगम मालमता खरोखरच डोळे फिरविणारी आहे. ४०-५० नव्हे तर चक्क ९९ कोटी ३० लाख ६१ हजार रुपये जंगम अन् स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वाधिक धनाढ्य उमेदवार म्हणून जाधव यांची हिंगोली मतदार संघात ओळख झाली आहे. तर आपण जनतेसाठी ही निवडणूक लढवत असल्याचे जाधवांनी स्पष्ट केले आहे.
अबब! अपक्ष उमेदवार शिवाजी जाधवांची मालमत्ता ९९ कोटी ३१ लाख रुपये - richest candidate
अॅड. शिवाजी जाधव यांची स्थावर व जंगम मालमत्ता खरोखरच डोळे फिरविणारी आहे. ४०-५० नव्हे तर चक्क ९९ कोटी ३० लाख ६१ हजार रुपये जंगम अन् स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वाधिक धनाढ्य उमेदवार म्हणून जाधव यांची हिंगोली मतदार संघात ओळख झाली आहे.
शिवाजी जाधव यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार तथा माजी खा. सुभाष वानखेडे यांची कुटुंबीयांसह ९ कोटी २९ लाख ३० हजार २६३ एवढी स्थावर जंगम मालमत्ता आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या कुटुंबीयांकडे १ कोटी ४ लाख ४४ हजार ४५८ एवढी मालमता आहे. एकंदरीत १८ एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी ४२ उमेदवारांनी निवडणूक विभाकडे नामनिर्देशन पत्र दाखक केले होते. एकूण उमेदवारापैकी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या विवरण पत्रावरून जाधव यांची संपत्ती सर्वाधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते या मतदारसंघात धनाढ्य उमेदवार ठरले आहेत. एवढेच नव्हे तर जाधव यांच्याकडे एक ट्रॅक्टर, एक जेसीबी, बीएमडब्ल्यू, मर्सडीज बेंज सह महागाड्या ११ कार आहेत. सोबतच ७ लाख ८० हजार रुपयांचे २५ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिनेही आहेत. विशेष म्हणजे ७५ हजार रुपयांचे रिव्हॉल्व्हर आहे. तसेच बँकेतील ठेवी, शेअर्स, बंधपत्रे, विमा , पॉलिसी, वाहने अशी एकूण ९ कोटी ३९ लाख ५४ हजाराची जंगम मालमत्ता आहे. तर वडिलोपार्जित त्याचबरोबर विकत घेतलेली शेतजमिनी, फ्लॉट, खुला भुखंडांची मिळून किंमत ५६ कोटी ४८ लाख रुपये होते. तर जाधव यांच्या पत्नी डॉ. लीना जाधव यांच्याकडे वाहन, सोने, हिऱ्याचे दागिने, बँकेतील ठेवी विमा अशी ९८ लाख ९५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांच्या नावे शेतजमीन, निवास इमारत मिळून ६ कोटी ८६ लाख ८१ हजार रुपयांची मालमत्ता आहे. जाधव यांच्यावर १४ कोटी ९७ लाख २९ हजार रुपयांचे बँका आणि पतसंस्थचे कर्ज आहे. तर मुलगी अवंतिकाच्या नावावर २२ लाख ३२ हजार रूपाची मालमत्ता तर ४७ लाख ५६ हजाराचे कर्ज आहे. मुलगा आदित्य च्या नावाने ९९ लाखांचे कर्ज आहे. शिवाजी जाधव यांच्याकडे १२ लाख रुपये रोख असून पत्नीकडे ३ तर मुलाकडे २ लाख ३० हजार रुपये रोख आहेत.
काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्याकडे कुटुंबासह ९ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर वानखेडे यांच्याकडे १ लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर आहे. २० तोळे सोने, अन पत्नी अनिता कडे ३० तोळे सोने आहे. वानखेडेच्या नावावर ४४ लाख ९९ हजार ८९ तर पत्नीच्या १६ लाख २२ हजार १८८ एवढी मालमत्ता आहे. तर मुलगी डॉ. शिवानीकडे ५ ग्रॅम सोने आहे. मुख्य म्हणजे विवरण पत्रात एकही चारचाकी वाहन नसल्याचे नमुद केले आहे. वानखेडे यांच्या नावावर भूखंड, वाणिज्य, शेती घरे, इमारत अशी ९ कोटी १६ लाख ७८ हजार रुपयांची तर पत्नीच्या नावे १२ लाख ५१ हजाराची शेतजमिन आहे.तर महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत पाटील यांच्याकडे १ कोटी ४ लाख ४४ हजार ४५८ रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे.
विशेष म्हणजे जाधव यांनी परदेशातून एलएलएम कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तर ते भाजप कडून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र ऐन वेळी पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यानी जनतेच्या खातर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यानी फोनवरून संपर्क साधला होता. तसेच मागील काही दिवसापासून हिंगोलीत तळ ठोकून असलेले शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अर्ज माघे घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे आता जाधवांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.