हिंगोली - आजही आदिवासी समाजावरील अन्याय, अत्याचार कमी झालेला नाही. आदिवासी समाजाची मुख्य समस्या पूर्वजापासून कसत आलेल्या वनजमिनी नावावर कराव्यात यासाठी आदिवादी प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. हा लढा कायम ठेवण्यासाठी आदिवासीने विद्रोही साहित्य संमेलनाचा सहारा घेतला आहे. या संमेलनातून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभाचे राज्य सचिव करणसिंग कोकणी आणि राजेंद्र गरजी यांनी हिंगोली येथील साहित्य संमेलनात केले.
आदिवासीच्या पूर्वजांचा वन विभागाने सतत छळ केला आहे. जंगल परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी वन विभागाच्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी वन पेटवून देत आहेत. असा चुकीचा संदेश वनविभागाकडे दिल्यावरून, वनविभागाने आदिवासीच्या महिला व पुरुषांना मारहाण करण्यात आली. ती परिस्थिती सांगताना आजही अंगावर काटे उभे राहतात. जे नाही ते हे वनविभागाचे अधिकारी प्रयत्न करू लागले, कधी पुरुषांच्या खांद्याला बंदूक रोवली जायची तर कधी अमानुष मारहाण करायचे. मात्र, कोणत्याही आदिवासीला या वनविभागाच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारण्याची हिम्मत झाली नाही.
केवळ मरण्याच्या भीतीने बरेच आदिवासी जागा मिळेल त्या दिशेने धावत सुटले. वनसंरक्षण कायद्यांतर्गत या जमिनी कसत असलेल्या आदिवासींच्या नावावर करण्याच्या तरतूदी असतानाही त्या केल्या जात नाहीत. त्यामुळे आजही आदिवासीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आपण कसत असलेल्या जमिनीची सातबारा मिळविण्यासाठी आदिवासी अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. मात्र, आदिवासीच्या मागणीकडे शासन पूर्णता दुर्लक्ष करीत आहे.
अनेकांचा सहारा घेऊनही प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश येत आहे. त्यामुळेच आता विद्रोहीमुळेंच न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. असा विश्वास ठेवून गेल्या १४ वर्षापासून महाराष्ट्रात भरविण्यात येणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात हे आदिवासी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात. आदिवासी रानोडा (टोपलीवाला) नृत्य सादर करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. एवढे दुःख असूनही पुरुष महिलांची वेशभूषा परिधान करून, नृत्य सादर करतात. जेणेकरून काही क्षण तरी मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. तेव्हापासून रानोडा नृत्याला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. आता हे नृत्य एवढे लौकिक झाले आहे की, प्रत्येक शुभप्रसंगी कार्यक्रमात किंवा विवाहाप्रसंगी देखील या नृत्य करणाऱ्यांना बोलावणे येते. टोपीवाला म्हणून यांची ओळख आहे. हे नृत्य करणारे देखील हिंगोली येथे सुरू असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी आजही आदिवासीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराने अदिवासीचे हाल होत असल्याचे टोपलीला राजेंद्र यांनी सांगितले.