हिंगोली -वाहतूक शाखेच्यावतीने फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्याविरोधात एक विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली वाहतूक शाखेच्यावतीने दादा, भाऊ, काका आदी प्रकारची नावे नंबर प्लेटवर असलेल्या वाहनांवर कारवाई झाली. त्यामुळे अनेक वाहनचालकांची भंबेरी उडल्याचे दिसून आले.
हिंगोलीत फॅन्सीनंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई
फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली वाहतूक शाखेच्यावतीने दादा, भाऊ, काका आदी प्रकारची नावे नंबर प्लेटवर असलेल्या वाहनांवर कारवाई झाली. या कारवाईत 52 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीतून अनेक दुचाकीस्वार आडवे-तिडवे गाडी चालवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत. अनेक दुचाकींची नंबर प्लेट फॅन्सी असल्याने अपघात करणाऱ्या गाडीचा शोध घेणे कठीण जाते. त्यामुळे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी वाहनधारकांना फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकीचा न वापरण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही अनेकजण अशाच गाड्यांवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे आज वाहतूक शाखेच्यावतीने विशेष मोहीम राबवून आत्तापर्यंत 92 दुचाकी जप्त केल्या आहेत. तर 160 वाहनांवर कारवाई करून 52 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईतून शेतकरी व कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना आजच्या दिवस सवलत देण्यात आली. हिंगोली वाहतूक शाखा नेहमी वाहतुकीसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून वाहनधारकांना नियमांची आठवण करून देते.