हिंगोली - तालुक्यातील पातोंडा येथील वन विभागाच्या जमिनीवर येथील काही शेतकर्यांनी अतिक्रमण केले होते ते अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे यासाठी वन विभागाकडून अशा क्षेत्रात नोटिसा देखील दिल्या होत्या मात्र तरीही शेतकऱ्यांनी अतिक्रमण स्वतः काढून न घेतल्याने बुधवारी पहाटेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी अतिक्रमण हटविण्यासाठी ( Action on encroachment on forest land in pantonda ) गेले असता संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली यामध्ये वन विभागाचे अकरा तर सात शेतकरी झाले आहेत. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हवेत दोन गोळीबार केला. तेव्हा कुठे शेतकऱ्यांनी तेथून पळ काढला. दिवसभर अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पातोंडा येथील प्रकरण चिघळले; विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू -
पातोंडा येथील वनविभागाने अतिक्रमण हटविताना शेतकऱ्यांने दगडफेक केली, नंतर वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर लाठीचार्ज केला एवढेच नव्हे तर हवेत दोन गोळीबार ही केला होता. त्यामुळे भयभीत झालेल्या एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्या शेतकऱ्याचा गुरुवार रोजी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाला. वन विभाच्या अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, लाल बावटा यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली. या प्रकाराने आता या घटनेला वेगळेच वळण आले आहे.
शेतकऱ्यांची दगडफेक तर अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार -
पातोंडा शिवारात वन विभागाच्या असलेल्या एकूण जमिनीपैकी येथील १८ शेतकऱ्यांनी ११ हेक्टर जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. त्यांना वन विभागाच्या वतीने अनेकदा अतिक्रमण हटवून घेण्याच्या अनेकदा सूचना दिल्या आणि एवढेच नव्हे तर लिखित नोटिसा देखील बजावलेल्या आहेत मात्र शेतकऱ्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी वन विभागाच्यावतीने ग्रामपंचायतीला नोटिसा लावून त्याचा पंचनामा केला होता त्यानुसार आज वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तोच शेतकऱ्यांनी देखील त्यांच्याजवळ धाव घेतली, शेतकरी अन अधिकारी यांच्यात बोलणे सुरू असतानाच जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी अन अधिकारी यांच्यात वाद झाला, अन लागलीच मारहाण करण्यास सुरुवात केल्याने, शेतकऱ्यांनी दगड फेक केली, यामध्ये अकरा कर्मचारी जखमी झाले आहेत. तर सात शेतकरी देखील जमखमी झाले आहेत. दगड फेक जास्तच वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हवेत दोन गोळीबार केले.
कॅमेरा बंद करून मारहाण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप -
घटनास्थळी शेतकऱ्यांना बोलावून त्यांना थेट मारहाण करण्यात आली यावेळी मात्र कर्मचारी सोबत असलेला कॅमेरा बंद करण्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जातोय तर आमच्याकडील मोबाईल देखील जप्त केल्याचे शेतकरी सांगत आहेत. दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे पातोंडा येथे भयभीत वातावरण निर्माण झाले होते तर शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमण जमिनी तीमध्ये जेसीबीच्या साह्याने मोठमोठे पाठ खोदण्याचे काम सुरू होते.
दिवसभर पोलीस अन वनविभागाचे पथक तैनात -
मागील अनेक वर्षापासून वन विभागाच्या जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासंदर्भात अनेकदा सूचना देखील दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर अतिक्रमण हटविण्याच्या सूचना वरिष्ठ विभागाकडून मिळाल्या असल्या तरीही शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा लिखित सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील शेतकऱ्याने अजिबात कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच ही टोकाची भूमिका उचलण्याची वेळ आल्याचे सहाय्यक वनसंरक्षक विश्वनाथ टाक यांनी सांगितले.