हिंगोली - संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शाळा बंद असल्याने, शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे, याची आम्हाला जाण आहे. मात्र, त्यांची काळजी करणे गरजेचे आहे. सर्व विचार करूनच राज्यात याआधी जुलै महिन्यात शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यातही आला होता. तसा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला होता. नंतर बालरोगतज्ज्ञ तसेच शिक्षणतज्ञांशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्याने, शाळा उघडण्याचा निर्णय हा मागे घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.