हिंगोली - नांदेड ते हिंगोली महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने अनेकांचे प्राण घेतले असून, आज (सोमवार) या रस्त्याने प्रवास करणाऱ्या जवानाच्या बंदुकीतून खड्यामुळे गोळी सुटून जवानांचा मृत्यू झाला. ही घटना कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे घडलीय, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला आहे.
अन् गोळी थेट जवानाच्या छातीत लागली -
पापाला भानुप्रसाद (वय ३५ वर्ष) (Papala Bhanuprasad) असे मयत जवानाचे नाव आहे. जवान कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे असलेल्या सशस्त्र सीमा बल या तुकडीतील एका सहकार्यासह बलातील फोर्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणण्यासाठी नांदेड येथे जात होता. अचानक गाडी खड्ड्यामध्ये गेल्याने जवानाच्या हातातील बंदुकीचा बटन दाबले गेले अन् गोळी थेट जवानाच्या छातीमध्ये लागली. जखमी जवानाला नांदेड येथील रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. जवान पापाला भानुदासप्रसाद हे आंध्र प्रदेशातील असून ते येलकी येथील शिवारात असलेल्या कामठा फाटा येथील सशस्त्र सीमा बल या प्रशिक्षण केंद्रात गेल्या काही महिन्यापासून कार्यरत होते. सीमा भागातील सहकारी चालक कानाराम यांच्यासोबत सीमा बलातील फोर्सच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका यांना नांदेड येथून आणण्यासाठी नांदेड रेल्वे स्टेशन कडे जात होते.