हिंगोली- शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करुन कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी नवसंजीवनी योजना सरकारने सुरू केली. मात्र या योजनेच्या लाभासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहायकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने औंढा येथे रंगेहात पकडले. पी. एस. राऊत असे लाच घेणाऱ्या कृषी सहायकाचे नाव आहे. या योजनेत लाच घेणारा हा पहिलाच कर्मचारी असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या योजनेचा असा उदात्त हेतू असताना देखील या योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे कृषी सहायक राऊतने २१०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड हजार रुपये पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरवले. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.