महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा कायद्याचा बडगा पडतो तेव्हा..... - गुन्हा

८० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली

By

Published : Mar 14, 2019, 7:26 PM IST

हिंगोली- कायद्यापुढे कोणीच लहान मोठे नाही. नेहमीच कलमाची भाषा वापरून आरोपीला विविध गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न अनेक पोलीस कर्मचारी करतात. मात्र, जेव्हा एका आरोपीसारखी वेळ पोलीस अधिकाऱ्यावर येते तेव्हा मात्र त्याला पळता भुई थोडी होते. होय याचा खराखुरा अनुभव आला आहे तो एका सहायक पोलीस निरीक्षकाला. माधव कोरंटलू असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेतल्यावर लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाचे मुख्यद्वार बंद ठेवले होते. या कारवाईने मात्र पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्याचे पोलीस प्रशासन मागील काही महिन्यांपासून विविध कारणावरून चर्चेत आहे. २७ डिसेंबर रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपनिरीक्षक माधव कोरंटलू याने तक्रारदराला ८० हजाराची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती ५० हजार लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली होती. तर २७ डिसेंबर रोजी लाचलुचपत विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारीची पडताळणी करून, पोलीस पाटील दीपक अंभोरे, पोलीस नाईक जैताडे आणि खाजगी इसम विलास काळे याना रंगेहात पकडले. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता.

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कोरंटलू यांचा सहभाग होता. मात्र, त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या हाती काही पुरावा नव्हता. काही दिवसांनी गोरेगाव पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या कोरंटलूला आज लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बराच वेळ चौकशी सुरू होती. कॉल डिटेल्सवरून लाच मागण्यांमध्ये कोरंटलूचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आता आपणाला अटक होणार या भीतीने कोरंटलू फोनवर बोलण्याचा बहाणा करत करत लाचलुचपत विभागाच्या बाहेर आले अन् धूम ठोकली. त्यामुळे कार्यालय परिसरात असलेल्या ५ ते ६ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरंटलूचा चोर-चोर म्हणत पाठलाग केला. तर पळताना दगडावरून पाय घसरल्याने कोरंटलू पोलिसांच्या हाती लागले. त्याला मारतच लाचलुचपत कार्यालयात आणण्यात आले. कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आतून बंद करून घेण्यात आले. काही पोलीस अधिकाऱ्यांनी लाचलुचपत कार्यालयात धाव घेतली. बराच वेळ बंद दरवाज्यात काय चर्चा झाली ? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली

या प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ उडाल्यामुळे लाचलुचपत विभाग कार्यालय परिसरात जागोजागी पोलीस प्रशासनाच्या गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे या प्रकाराची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आज एका पोलीस अधिकाऱ्याला एखाद्या चोरासारखे पाठलाग करून ताब्यात घेतल्यामुळे खरोखरच कायद्यापुढे सारे समान असल्याचा प्रत्यय दिसून आला. या घटनेने पुन्हा हिंगोलीच्या पोलीस प्रशासनाचा डंका वाजला हे मात्र खरे. अशाही परिस्थितीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या कारभार विस्तारण्याचा खूप प्रयत्न करीत आहेत. मात्र नवनवीन प्रकरण समोर येत असल्याने पुढे पाठ माघे सपाट याच म्हणीचा हिंगोलीत प्रत्यय येतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details