हिंगोली - बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पार पडले. कोरोना महामारीमुळे अगदी मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जेष्ठ नागरिक पांडुरंग पाटील मारकड यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण झाले या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख व कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार कृष्णकांत कानगुले, अशोक नाईक, राम कदम, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, संस्थांचे सदस्य पतंगे, रवी शिंदे, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, केशव नाईक, सुरेंद्र ढाले, शिवाजी ढाले, शशिकांत वडकुते आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार होते अनावरण -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार होते. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार बांगर यांनी अनेकदा मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना होकारही दिला होता. मात्र, अचानक कोरोनाची दुसरी लाट आल्याने मुख्यमंत्र्यांना अनावरणाला हजर राहणे झाले नाही. त्यामुळे अनावरणावरून चांगलेच राजकारण तापले होते. प्रशासनाकडे पुतळा अनावरणासाठी मागणी केली जात होती. एवढेच नव्हे तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी 16 मार्च ही तारीख निश्चित करून, तशा निमंत्रण पत्रिकादेखील काढल्या होत्या. ते स्वतः हजर राहून एखाद्या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करणार होते. तर, दुसरीकडे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी 11 मार्च तारीख जाहीर करून मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित अनावरण कार्यक्रम आटोपुनही घेतला.
आमदाराला पडला वर्षाचा विसर -
शिवसेना आमदार संतोष बांगर पुतळा अनावरण प्रकरणी बोलत असताना त्यांना नेमके सध्या कोणते वर्ष सुरू आहे हेच माहित नसल्याचे दिसून आले. त्यांना अगोदर विचारपूस करून पुतळा कधी बसवला माहिती घ्यावी लागली.