हिंगोली - राज्य राखीव दल गट क्रमांक बारा येथे कर्तव्य बजावणाऱ्या एका जवानाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
सुनील भीमराव जाधव (बक्कल नं. १०५४ रा. कोल्हापूर ) असे मयत जवानाचे नाव आहे. जाधव हे आपल्या पत्नीसह राज्य राखीव दलाच्या वसाहतीत वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे सकाळी पत्नी उठली तर तिला आपले पती घरातील पंख्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सदरील घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याला दिली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला.
हिंगोलीत जवानाची गळफास घेऊन आत्महत्या नक्षलग्रस्त भागात बजावले कर्तव्य -
सुनील जाधव हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. २००६ मध्ये ते हिंगोलीच्या राज्य राखीव दलात भरती झाले होते. त्यांनी आतापर्यंत देशातील विविध राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये सेवा बजावली आहे. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भागात ही कर्तव्य बजावले आहे. अत्यंत मनमिळावू जवान म्हणून त्यांची ओळख होती. या घटनेने राज्य राखीव दल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येची चौकशी केली जात आहे.