हिंगोली- कुठेही साप दिसला की अंगावर शहारे उभे राहतात. सापाला पाहताच अनेकजण भयभीत होतात. त्यात साप चावला तर भीतीनेच मृत्यू होईल अशी काहीशी परिस्थिती असते. अशात सापाला चावा घेण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, असाच काहीसा प्रकार कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात घडला आहे. ज्याची आता परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.
संजय कचरू खिलारे (वय 45), असे साप चावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात साप आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. सापाला पकडण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये संजय यांनी मोठ्या हिंमतीने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सापाने संजय यांना दंश केला.