हिंगोली - कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रत्येकजण स्वतःला घरात ठेवत आहे. महामारीच्या काळात बरेच जण आपआपल्यापरीने गरजेच्या वस्तूंची वाढीव दरात विक्री करून नफा कमवणाऱ्यांचीही कमतरता नाही. मात्र, अशा या विदारक परिस्थितीत स्वतःचा जराही फायदा न बघता लोकांचे जीव वाचावे, यासाठी प्रयत्न करणारा एक व्यक्ती हिंगोलीत आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'पांडव' नावाच्या एक लाख औषधांच्या बाटल्या या कोरोना योद्ध्याने मोफत वाटल्या आहेत.
डॉ. एस. डी. गुंडेवार असे या दानशूर डॉक्टरचे नाव आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते होमियोपॅथीची प्रॅक्टिस करतात. त्यांनी या कालावधीमध्ये अनेक व्हायरल इन्फेक्शनवर औषधींचे शोध लावले आहेत. त्या औषधींमुळे अनेक रुग्णांना गुणदेखील आला आहे. त्यामुळे डॉक्टर गुंडेवार हे सर्वदूर प्रसिद्ध आहेत. सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे प्रत्येकजण कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. डॉ. गुंडेवार यांनीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एका औषधाचा शोध लावला आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर कोरोनाची ताबडतोब लागण होते. यावर उपाय म्हणून गुंडेवार यांनी पाच औषधांचे एकत्र मिश्रण करून 'पांडव' नावाची औषधी तयार केली. या औषधांचे त्यांनी मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी 5 हजार औषधांच्या बाटल्या वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांच्या औषधाला मागणी येऊ लागल्याने त्यांनी आत्तापर्यंत औषधांच्या एक लाख बाटल्या मोफट वाटप केल्या. रात्रंदिवस कोरोनाला हरवण्यासाठी परिश्रम घेणारे अनेक डॉक्टरदेखील या 'पांडव'चा आधार घेत असल्याचे डॉ. गुंडेवार यांनी सांगितले.