हिंगोली -दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे जीव तहानेने व्याकुळ होत आहे. हीच गरज लक्षात घेऊन अनेकांनी शहरात जागोजागी पाणपोई सुरू केली आहे. मात्र, हिंगोली येथील बसस्थानक परिसरातील पाणपोईवर गेल्या ५ वर्षांपासून पाणी वाटप करत एका ८५ वर्षांच्या आजोबांनी आदर्श निर्माण केला आहे. हे आजोबा पाणपोईच्या माध्यमातून प्रवाशांची तहान भागवतात.
विश्वनाथ मांदळे पाणी वाटप करताना विश्वनाथ मांदळे असे या आजोबांचे नाव आहे. त्यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने, त्यांना ते जमत नव्हते. अशाच परिस्थितीत ७ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात पाणपोई उद्घाटन झाले. तेथूनच आजोबांनी पाणीवाटपाला सुरुवात केली. त्याठिकाणी त्यांनी तब्बल तीन-साडेतीन वर्षे प्रवाशांना पाणी दिले. आता ५ वर्षांपासून ते बसस्थानक परिसरात पाणपोईवर पाणी वाटप करतात. प्रवाशांना पाणी दिल्यानंतर समाधान लाभत असल्याचे आजोबांनी सांगितले.
आजही आजोबा न थकता दिवसभर पाणी देण्याचे काम करतात. पाणी सांडवणाऱ्यांवर आजोबा जाम भडकतात. ते दिवसभर पाणी वाटप करतात अन सायंकाळी घराचा रस्ता पकडतात. आजोबांचा हा रोजचा दिनक्रमच ठरला आहे. ते प्रवाशांना नेहमी त्यांची तहान पाहून पाणी देतात. ते पाणी देताना पहिला पेला भरून, दुसरा अर्धवट आणि आणखी पाणी मागितलेच तर तिसरा पेला अगदीच कमी भरून देतात. पाणी वाटप करणारे आजोबा बसस्थानक परिसरात सर्वांचेच परिचित झालेले आहेत.
बसस्थानक परिसरात असलेल्या पाणपोईवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या सर्व प्रवाशांना आजोबा स्वत: पाणी वाटप करतात. त्यांना मदत करणारेही अनेकजण आहेत. आजोबांचा पाणी वाटपाचा उत्साह बघून तरुणांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तपोवन आश्रम नर्मदा तट गुरुपरिवाराच्यावतीने बस्थानक परिसरात ५ ते ६ वर्षांपासून पाणपोई चालवली जाते. आता या पाणपोई पाठोपाठ सफा बैतुला मालाच्यावतीनेही पाणपोई सुरू केली आहे. पाणपोईचा उपक्रम खरोखरच प्रवाशांसाठी संजीवनीच ठरत आहे.