हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का; रिश्टरस्केलवर ३.३ तीव्रतेची नोंद
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ३.३ रिश्टरस्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजवाडी, सोनवाडी, जलालदाभा यासह आदी गावात, तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी या गावात अन् कळमनुरी तालुक्यातील व हिंगोली शहराजवळ असलेल्या काही गावात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिंगोली- जिल्ह्यामधील गेल्या काही वर्षाच्या नोंदी पाहिल्या असता, जिल्ह्यात अनेकवेळा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. शुक्रवारी गणेश आगमनाच्या दिवशीही हिंगोली जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शुक्रवारी रात्री १०.२७ वाजताच्या सुमारास ३.३ रिश्टरस्केल तीव्रतेचा भूकंप झाला. रात्रीच्या सुमारास झालेल्या या भूकंपनाने अनेक नागरिकांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाच्या हादऱ्यामुळे जिल्ह्यात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने या भूकंपाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.