हिंगोली - जिल्ह्यातील गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय विविध गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असते. आता तर फक्त कटर नसल्याच्या कारणावरून अपघातातील एक मृतदेह शवविच्छेदनासाठी तब्बल २० तास ताटकळत ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे या खळबळजनक घटनेने पुन्हा एकदा गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालय चर्चेत आले आहे.
मृत्यूनंतरही हेळसांड; हिगोंलीमध्ये कटर नसल्यामुळे शवविच्छेदनास २० तास उशीर - उशीर
गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त कटर नसल्याच्या कारणावरून अपघातातील एक मृतदेह शवविच्छेदनासाठी तब्बल २० तास ताटकळत ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
जिल्ह्यातील जामठी बु. येथे विवाहासाठी मुंबईवरून आलेल्या पाहुण्यांना रस्ता दाखविण्यासाठी गेलेल्या ओम कुंडलिक रत्नपारखी (३५) याचा अपघातात मृत्यू झाला. जामठी बु. पासून काही अंतरावर एका ऑटोची आणि रत्नपारखी यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने रत्नपारखी यांचा जागीच मृत्यू झाला. गोरेगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. नातेवाईकांनी शवविच्छेदन होऊन मृतदेह ताब्यात मिळण्याची रात्रभर वाट पाहिली. मात्र, मृतदेह ताब्यात मिळाला नाही. नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोड्याच वेळात माणूस येईल, त्यावेळी शवविच्छेदन केले जाईल, असे सांगण्यात आले.
नातेवाईक शवविच्छेदन कक्षासमोर मृतदेह ताब्यात मिळावा, या प्रतिक्षेत बसले होते. त्यावेळी दुपारी एक कर्मचारी आला. त्यावेळी त्याला उशीर झाल्याचे कारण विचारले असता कटर नसल्यामुळे शवविच्छेदनास उशीर झाल्याचे सांगितले. केवळ कटरमुळे शवविच्छेदनास २० तास उशीर झाल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते