हिंगोली -जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिप-रिप सुरु असल्याने खरिपाच्या पिकाची पूर्णता वाट लागली आहे. आज पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी-नाले लगतचे उरलेसुरले खरिपाचे पीक वाहून गेले आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात अतिवृष्टी झाली असून दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील व इतरही तालुक्यातील पिकांची फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे औंढा तालुक्यातील तर विविध भागात अतिवृष्टी झाली असून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते वाहून गेली आहेत. या भागातील नागरिक हवालदील झाले आहेत. पावसाचा जोर हा कायम असून शेतीतील पिके पूर्णपणे खरडून गेली आहेत.