हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने सर्वांनाच चिंता लागली होती. मात्र, प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण दहा कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. एकदम 10 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे हिंगोलीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. तर, सोमवारी एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.
कोरोनावर मात केलेल्यांमध्ये हिंगोली येथील लिंबाळा केअर सेंटरमधील 4 जण, यात प्रगती नगर येथील 1, पिंपळखुटा येथील 1 आणि भांडेगाव येथील दोन जणांचा समावेश आहे. तर, वसमत कोरोना केअर सेंटर अंतर्गत टाकळगाव येथील 2, रिधोरा 1, दर्गा पेठ 1 आणि कळमनुरी कोरोना केअर सेंटर अंतर्गत एकूण 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे दोघेही जण विकास नगर भागातील रहिवासी आहेत.
या रुग्णांनी कोरोनवर विजय मिळवल्यामुळे जिल्ह्यामध्ये खरोखरच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, वसमत येथील क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एका व्यक्तीचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा अशोक नगर भागातील रहिवासी असून, तो औरंगाबादमधून वसमत येथे आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या ही 333 वर पोहोचली असून, त्यापैकी 287 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला एकूण 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 16, वसमत येथे 13 कळमनुरी येथे सात निंबाळा अंतर्गत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण सात, सेनगाव 3 असे एकूण जिल्ह्यात 46 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सोमवारी 719 व्यक्ती हे कोरोना संशयित म्हणून दाखल असून, त्यापैकी 317 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.