हिंगोली - जिल्ह्यात आज (7 जून) दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे शेतात वीज पडून एक महिला व शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार महिला जखमी झाल्या आहेत. दुसऱ्या घटनेत औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे घरासमोर बांधलेली दोन गुरे दगावली आहेत.
इंदिराबाई कोंडबाराव भिसेंचे मृत्यू
इंदिराबाई कोंडबाराव भिसे (79 वर्षे. रा. जरोडा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रेणुका प्रकाश भिसे, सुरेखा प्रकाश भिसे, जिजाबाई गायकवाड, अकुबाई सूर्यवंशी अशी जखमी महिलांची नावे आहेत. ह्या सर्व महिला जरोडा येथील देविदास भिसे पाटील यांच्या शेतात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गेल्या होत्या.
केशव रिठेंच्या दोन जनावरांचा मृत्यू
आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्यात दुपारच्या वेळेस अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मजूर महिला या पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली जाऊन थांबल्या होत्या. तेवढ्यात वीज पडली आणि इंदिराबाई व त्यांच्यासोबत असलेल्या एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. तर ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे केशव रिठे यांनी घरासमोर बांधलेल्या गाय आणि बैलावरही वीज पडली. त्यामुळे ते जागीच ठार झाले.