गोंदिया - गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आणि सडक-अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या गोंदिया-कोहमारा-नवेगावबांध महामार्गावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
गोंदिया-कोहमारा-नवेगावबांध महामार्गावर खड्डे, खड्ड्यात भातलावणी करत व्यक्त केला संताप - तीव्र आंदोलनाचा युवकांचा इशारा
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या कोहमारा नवेगावबांध या महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात होत असून काहींचा जीवही गेला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यासाठी येथील युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

या मार्गावर असलेल्या पुलावरदेखील मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. बांधकाम विभाग तसेच जनप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. त्यासाठी या परिसरातील काही युवकांनी बांधकाम व जनप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी चक्क पुलावरच्या स्त्यावरील खड्ड्यात रोवणी करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना जोडणारा कोहमारा नवेगावबांध या प्रमुख रस्ता आहे. यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रस्त्याचे काम लवकरात लवकर करा अन्यथा आम्ही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही या युवकांनी दिला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून या रस्त्याची दूरवस्था झाली. त्यामुळे दरवर्षी या रस्त्यावर अपघात होऊन दोन तीन जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी या परिसरातील युवकांनी केली आहे.