गोंदिया- सिरोली येथील युवकाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा परिसरात आत्महत्या केली. त्याने दोन दिवसापूर्वी एका महिलेला मारहाण करत गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
गोंदियातील युवकाची गडचिरोलीत आत्महत्या; दोन दिवसांपूर्वी महिलेला केली होती मारहाण - Youth suicide in vadsa
दोन दिवसापूर्वी एका महिलेला मारहाण करत गंभीर जखमी करणाऱ्या युवकाचा मृतदेह कोकडी शिवारात एका झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. यामुळे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेली महिला व युवक हे महागाव येथे शेजारी म्हणून राहत होते. या दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व ते घर सोडून निघून गेले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात युवक महागाव येथे तर महिला गडचिरोली जिल्ह्यातील वडसाजवळील कोकडी येथे गेली.
काही दिवसापूर्वी युवक कोकडी येथे गेला असता, दोघांमध्ये वाद झाला. यातून दोन दिवसापूर्वी युवकाने महिलेला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्या महिलेवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज युवकाचा मृतदेह कोकडी शिवारात एका झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना समोर येताच दोन्ही जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.