गोंदिया - आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या राख्या पाहिल्या असतील. त्या राख्या पाहून तुम्ही आकर्षितही झाले असाल. बाजारात मोठ्या प्रमाणात चिनी राख्यांनी मार्केट गजबजलेले दिसते. मात्र, येथील महिला गाईच्या शेणापासून इकोफ्रेंडली राख्या तयार करत आहेत.
ईटीव्ही भारतचा विशेष अहवाल. गोंदियाच्या चुटिया गावातील लक्ष्मी गौशाळेत हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. कोरोनाच्या या महासंकटात अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायही संकटात आले. चुटिया गावातील अनेक महिलांनाही याचा फटका बसला. मात्र, अशातच या महिलांनी एकत्र येत जिद्दीने एक उपक्रम राबविला आहे. या महिलांनी गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत आणि माध्यमांतून महिलांना रोजगारही उपल्बध करून दिला आहे. याबाबत ईटीव्ही भारत'ने विशेष आढावा घेतला.
गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना -
गोंदिया अंतर्गत येत असलेला चुटिया गावात ऋषी टेंभरे आणि प्रीती टेंभरे हे दाम्पत्य राहतात. या दोघांनी पाच वर्षाआधी चुटिया गावात गीर प्रजातीच्या गायीची गौशाळा उघडली. त्यावेळी त्यांनी दुधापुरते मर्यादित न राहता गाईच्या शेणापासून सेंद्रिय खते, अगरबत्ती तर गौमुत्रापासून फिनाईल, औषधे तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून लोकांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या हाकेला टेंभरे दाम्पत्याने प्रतिसाद दिला असून प्रीती टेंभरें या महिलेने कोरोना विषाणूमुळे चिनी वस्तूवर होणारा बहिष्कार टाकला आणि येणाऱ्या रक्षा बंधनाचा उत्सव पाहता त्यांना गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सुचली.
राखीला बाजारपेठेत मागणी -
सुरुवातीला त्यांनी याचा अभ्यास करत या उद्योगाला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी गाईच्या शेणापासून 6 हजार राख्या बनवून त्याची विक्री केली आहे. महाराष्ट्रासह गुजरातमध्येही त्यांनी राख्या विक्रीसाठी पाठवल्या आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी गावातील रोजगार गमावलेल्या महिलांना एकत्र केले. त्यांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर बघता बघता गावातील महिलांना या प्रशिक्षणाचा मोठा फायदा झाला आणि गाईच्या शेणापासून राख्या निर्मितीला सुरुवात झाली. 10 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत या राखीची किंमत आहे. म्हणून शेणापासुन बनलेली इकोफ्रेंडली राखी असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. टेंभरे दाम्पत्याच्या संकल्पनेतून आलेल्या या इकोफ्रेंडली राखीला बाजारपेठेसह मोठी मागणी निर्माण झाली आहे.
हेही वाचा -पंढरपुरातील 'खणचोळी राखी' पोहोचली भारतभर, लॉकडाऊन काळात पायलने दिला सूप्त कलागुणांना वाव
जावूचीही होते मदत -
प्रीती यांच्या लघुउद्योगात त्यांचे पती ऋषी टेभरें व जावू श्वेता टेभरेंही सहकार्य करत आहेत. पती ऋषी टेभरें हे मार्केटींगचे काम पाहतात आणि त्यांची जावु श्वेता टेभरे ही या आपल्याकडे तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी जाताना कुठलीही कमी राहू नये, राख्यांना व्यवस्थित रंग झाले कि नाही? व्यवस्थित पॅक झाल्या की नाही? याकडे विशेष लक्ष देतात.
मुख्य उद्देश्य आणि भविष्यातील प्रकल्प काय?
तर गाईपासून दुधच नाही तर तिच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून औषधे, राख्या बनविणे इतकेच मर्यदित न राहता गोहत्या थांबविणे हा प्रिती यांचा यामागचा मुख्य उद्देश्य आहे. राखीच्या मागच्या भागावर गायी वाचविण्याचा सामाजिक संदेश दिला आहे. यापुढे गाईच्या शेणापासून दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली दिवेदेखील बनविणार असल्याची माहिती प्रीती यांनी दिली. प्रीती टेंभरे यांचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.