गोंदिया- तिरोडा तालुक्यातील किडंगीपार गावाशेजारी खाणीत बारबरीक कंपनीच्या क्रशर मशीनच्या सहाय्याने व सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खाजगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. त्याचबरोबर, दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान खूप धूर निघतो. यामुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दगड फोडीचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याचा उपयोग न झाल्याने गावकऱ्यांनी कंपनीला बंद करण्यासाठी स्वतः कंपनीवर धडक मोर्चा काढला आहे.
गाव परिसरातील खाजगी खानीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले. तरीसुद्धा कंत्राटदार, जन प्रतिनिधी गावकऱ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच, सुरुंग लावून दगड फोडताना निघणाऱ्या धुरामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांंना त्रास होत आहे. बारबरीक कंपनी क्रशर मशीन व खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून फक्त २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील लोकांचा व जवळच्या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.