गोंदिया - देशाला स्वातंत्र मिळून इतकी वर्ष झाली, चंद्रावर जाणे सोपे झाले व देश डिजिटल युगाकडे चालला आहे. मात्र, जिल्ह्यातील चुंभली आणि चिलमटोला या गावातील नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही गावात जायला रस्ता नाही. गावातील नदीवर पूल नसल्याने जीर्ण बोटीने, टायर ट्यूबच्या मदतीने आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील ग्रामस्थांच्या अवस्थेचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला.
स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही 'गावात ना रस्ता, ना नदीवर पूल' देवरी तालुक्यांंतर्गत नक्षलग्रस्त भागातील चुंभली आणि चिलमटोला हे गावे आहेत. या गावात जवळपास ३०० लोकांची वस्ती आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून हे आदिवासी बांधव परिसरात राहत आहेत. मात्र, तालुका मुख्यालयापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलातील या गावात जायला रस्ता नाही. नदीवर पूलही नाही, त्यामुळे ग्रामस्थांना वर्षातून ८ महिने जीवघेणा प्रवास करुन जीवन जगावे लागते. गावातल्या प्रत्येक व्यक्तीला नावेने नदी ओलांडूत प्रवास करावा लागतो. छोट्यामोट्या कामाकरता या लोकांना नदी ओलांडून जावे लागते. मात्र, गावात एकच बोट असून ती देखील जीर्ण झाली आहे. त्यामुळे, एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जायचे झाल्यास एका व्यक्तीला पोहत जात नाव आणून इतर लोकांना घेऊन जावे लागते.
या गावात आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आले. मात्र, मत मागून गेल्यावर त्यांची पावलं परत कधीच या गावाकडे वळली नाही. तर, पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या सहसराव कोरोटे यांनी निवडणुकीच्या वेळी गावातील लोकांना निवडून आल्यावर पहिल्यांदा एक बोट देऊ आणि नंतर पूल व रस्ता तयार करून देऊ असे, आश्वासन दिले होते. तो शब्द राखत कोरोटे यांनी आज गावकऱ्यांना एक बोट भेट दिलीआहे. गावकऱ्यांच्या प्रवासाचा तात्पुरता प्रश्न सुटला असला तरी येत्या सहा महिन्यात या चुंभली नदीवर पूल तयार करून गावकऱ्यांना रस्ता तयार करून देऊ, असे आश्वासन आमदार सहसराव कोरोटे यांनी दिले आहे.
सध्या गावकऱ्यांना तालुका मुख्यालयी जायचे असल्यास किंवा विद्यर्थ्यांना शाळेत जायचे असेल तर २० किलोमीटर जंगलातील रस्ता ओलांडून दुसऱ्या मार्गाने जावे लागते. मात्र, गावातील नदीवर पूल बांधला तर अतिरिक्त लागणारा २० किलोमीटरचा प्रवास कमी होईल. त्यामुळे ग्रामस्थांचा वेळ वाचेल सोबतच जीवाचा धोकाही कमी होईल. त्यामुळे आणखी किती दिवस पुलासाठी वाट पाहावी लागणार असा प्रश्न ग्रामस्थ करत होते. मात्र, देवरी मतदारसंघाचे आमदार सहसराव कोरोटे यांनी गावकऱ्यांना स्वतःकडून बोट उपलब्ध करुन दिली आहे. तसेच येत्या सहा महिन्यात या गावातून वाहणाऱ्या नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वसनदेखील त्यांनी दिले आहे. आता नदीवरील पूल केव्हा तयार होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा -'उमेद'च्या खासगीकरणाविरोधात दहा हजार महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा