गोंदिया - कोरोनाने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे कोरोनावर मात करायची असेल तर आपण सगळ्यांना कोरोना लस घेणे गरजेचे ( Children Vaccination in gondia ) आहे. आज माझे वडील नाहीत. आपल्या कुटूंबातील प्रमुख कोणी आपल्या सोडून गेले तर आपल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, याची आपण कल्पना करुच शकता. म्हणून प्रत्येकाने कोरोना लस घेणे हे गरजेचे आहे व वाढत असेलल्या कोरोनावर आपण लस घेऊन व कोरोनाचे नियम पाळून त्याच्या वर मात करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी कोरोना लस घेणे खूप गरजेचे असल्याचे मत गोंदियातील १५ वर्षीय विद्यार्थिनी कल्याणी कावरे या तरुणीने व्यक्त केले आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्वतः कोरोना लस घ्या आणि स्वतःचा कोरोना पासून बचाव करा अशी हाक यावेळी तिने दिली आहे.
आम्ही घेतोय तुम्ही पण घ्या -
लस आहे पूर्ण सुरक्षित अफवांवर विश्वास नकोच, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आज ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षातील बालकांना लस देण्यात सुरुवात ( Children Vaccination in gondia ) झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४९ लसीकरण केंद्रावरून ६८ हजार ३२१ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीबाबत काहींमध्ये उत्सुकता तर काहींमध्ये भीती वाटत आहे. मात्र लस सुरक्षित असून आम्ही घेतोय तुम्ही पण घ्या असा संदेश देखील आज लस घेतलेल्या मुलांनी दिला.
६८ हजार ३२१ मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट -
देशात वाढत असलेले कोविड रुग्ण तसेच ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप इम्युनायजेशन तसेच स्टँडिंग टेक्निकल सायंटिफिक कमिटी यांनी कोविड -१९ लसीकरण वाढविण्यासाठी राज्यांमध्ये १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुलींना कोविड लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशावर आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला व मुलींना लस देण्यास सुरु झाले आहे. तर संपूर्ण देशासह गोंदिया जिल्ह्यात हि आज पासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ६८ हजार ३२१ मुलांचे लसीकरण केले जाणार आहे.