गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील अनेक गावात शेतशिवारात रचलेल्या धानाच्या गंजीला रात्रीच्या वेळेस आग लागल्याची घटना घडली. यामध्ये चाळीसच्यावर धानाच्या गंजी जळून खाक झाल्या असून शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसला आहे. तर, चिचगड येथे एक ट्रॅक्टर देखील जाळण्यात आले आहे. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही आग लागली नसून कोणीतरी लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी चिचगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डोंगरगाव, चिचगढ, रेहळी, मोहांडी, भागी, वॉन्डर, सुंदरी, कडी कसा, इस्तारी, बोगाटोला, अगणूटोला अशा अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील धानाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेस आग लागली. या आगीत चाळीसच्यावर धानाच्या गंजी जळून खाक झाल्या असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. शेतातील जळालेल्या धानाच्या गंजी बघून अनेकांना धक्का बसला आहे. याप्रकरणी एकाचवेळी अनेक गावातील धानांच्या गंजीला आग लागल्याने ही आग कोणातरी लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकरणी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.