गोंदिया- जिल्ह्याच्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप लांजेवार या तरुणाने आपल्या विवाह सोहळ्यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच स्वच्छ भारतचा संदेश दिला आहे. या आगळ्यावेगळ्या विवाहामुळे लग्नाला आलेले वऱ्हाडी लग्न मंडपात पोहचताच दंग झाले.
गोंदियात अनोखा विवाहसोहळा.. बेटी बचाव, बेटी पढाओ अन् स्वच्छ भारतचा संदेश - gondia
गोंदियातील एका तरूणाने सामाजिक संदेश देत अनोख्या पद्धतीने विवाह केला आहे. या विवाहसोहळ्यातून त्याने 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखे संदेश दिले आहेत.
देवरी तालुक्यात राहणारा कुलदीप हा लहानपणापासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महराजांच्या विचारांनी प्रेरित असून त्याने गुरुदेव सेवा मंडळात सहभाग घेत शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविले आहेत. त्याने नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धा परीक्षा देऊ शकले पाहिजेत म्हणून आदिवासी नक्षलग्रस्त भागात वाचनालय उभारत सामाजिक बांधिलकी जोपसली, तर आजच्या युगात आई वडिल मुलांना फक्त बाल संस्कार देतात मात्र आजची तरुणाई विवाह संस्कार सोहळा विसरल्याने कुलपदीने अनोखा विवाह सोहळा करणायचा निर्णय घेतला.
सुरूवातीला त्याच्या भावी वधूने याला नकार दिला. मात्र समजूत घातल्यावर तिला देखील हे विचार पटले आणि विवाह संस्कार सोहळ्याला ती तयार झाली. मग काय मातृदिनाचे औचित्य साधून हा अनोखा विवाह संस्कार सोहळा पार पडला. वऱ्हाडी लग्न मंडपात पोहचताच पुरुषांना बेटी बचाव, बेटी पढाओ तर महिलांना सप्तपदी स्वछ्तेची असे बॅच लावण्यात आले. एकीकडे स्वच्छ भारतचा संदेश देणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला तर दुसरीकडे राष्ट्र संतांचे विवाह संस्कार सांगणारे पोस्टर लावून स्टेजवर फुलांची सजावट न करता विवाह संस्कार सोहळ्याचा फलक लावण्यात आला. वऱ्हाड्यांच्या मनोरंजनासाठी संतांच्या विचारांचे भजन आणि अभंग सुरु होते. या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.