विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी वेतनासाठी केला यज्ञ; जिल्हा परिषदेसमोर महापूजा करून शासनाचा निषेध - विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक
विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत असणारे जवळपास चारशे शिक्षक मागील पंधरा ते वीस वर्षांपासून बिन पगारी नोकरी करत आहेत. या शिक्षकांनी आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु केले आहे.
विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी वेतनासाठी केला यज्ञ
गोंदिया -विनाअनुदानित शाळेत कार्यरत शिक्षकांचे वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर मागील बारा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. तरीदेखील त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दरम्यान 'वेतन लागू करण्याची सद्बुद्धी ईश्वर सरकारला देवो' यासाठी शिक्षकांनी चक्क जिल्हा परिषदेसमोर यज्ञ - हवन करून अनोख्या पद्धतीचा आंदोलन केले.
अखेर शिक्षकांच्या सहनशक्तीचा बांध फुटला असून त्यांनी शासन विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. क्रांती दिवस 9 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी शिक्षकांनी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन मंडपासमोर चक्क यज्ञ - हवन आयोजित करून महापूजा केली. 'हे ईश्वरा आम्हाला वेतन लागू करण्याची सद्बुद्धी सरकारला दे' अशी प्रार्थना आंदोलनकारी शिक्षकांनी यावेळी केली.