गोंदिया - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या पोटात व छातीत धारदार शस्त्र (चाकू) खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील खातिया येथे घडली. सुनील गोपीचंद डोंगरे (वय ४५) असे मृताचे, तर शुभम उर्फ बालू संतोष डोंगरे (वय २७, दोघेही रा. खातिया) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी पुतण्याला पोलिसांनी केली अटक
शुभम डोंगरे याने बुधवारी रात्री आपल्या घरी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत शुभमचे मित्र सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर मित्र नाचू लागले. मध्यंतरी शुभमच्या मित्रापैकी एकाने त्याचा काका सुनील डोंगरे यांच्या अंगणात जाऊन उलटी केली. त्यामुळे सुनील डोंगरे यांनी त्याला हटकले. मित्राला हटकले म्हणून चिडलेल्या शुभमने काका सुनील डोंगरे यांच्यासोबत भांडण करीत त्यांच्या पोटावर व छातीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनील डोंगरे यांना गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली असता पोलिसांनी आरोपी शुभम उर्फ बालू डोंगरे ला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्या करण्याचा गुन्हा रावणवाडी पोलिसांनी दाखल केला आहे.
हेही वाचा -मुंबईत पुन्हा छापेमारी, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र