गोंदिया-जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पुयार या मार्गावरुन क्वालीस वाहनातून दारू वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू नेताना पोलिसांनी पकडली आहे. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ही कारवाई बुधवारी रात्री केली आहे. पोलिसांनी जप्त केलेली दारू आणि क्वालीस वाहन असा ४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोंदियातून गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारू पकडली; अर्जुनी मोरगाव पोलिसांकडून 2 जणांना अटक
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू घेऊन जाणाऱ्या २ जणांना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी १ लाख १९ हजारांची दारू आणि ३ लाख रुपये किमतीची क्वालीस जप्त केली आहे. अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली
क्वालीस वाहन चालक सुदर्शन माणिक मेश्राम रा. उदापूर (ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), गुणीराम पुंडलिक मांदाडे रा. एकोडी कीन्ही (साकोली, जि. भंडारा) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ इ, ७७ अ, ८३, सहकलम १०९ भादवि नुसार अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्वालीस या वाहनातून पुयार मार्गे इटखेडा या गावाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी लगेच एक पथक तयार केले. पथकाला पुयार-इटखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यास रवाना केले. पोलिसांना इटखेडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर क्वालीस ( एमएच.३९ - १०९५) दिसून आली. या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट कंपनीचे दारूने भरलेले ४८ बॉक्स सापडून आले. या दारूची एकूण किंमत १ लाख १९ हजार ६०० रुपये होते. ३ लाख रुपये किमतीची क्वालीस जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे हे करत आहेत.