गोंदिया - तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कचेखनी परिसरातील जंगलात सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा मारून १ लाख ५० हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैधरित्या मोहफुलाची दारू विक्री होत असलेल्या करटी येथील एका हॉटेलवर धाड घालून १९ हजार ८०९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिरोडा शहरात अवैधरित्या दारू विक्री होत आहे. तिरोडा पोलीस वारंवार धडक मोहीम चालवत असल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जंगलात हलविले आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली. कचेखनी (चोरखमारा) जंगलात सुरु असलेल्या हात भट्टयांसह ८५ प्लास्टिक चुंगडीत १,७०० किलो सडवा मोहफूल, ९ प्लास्टिक कॅनमध्ये ९० लिटर मोहफुलांची दारू, २ लाकडी टवरा, १ जर्मन घमेला, २ लोखंडी ड्रम, १ नेवारे पट्टी, १ प्लास्टिक पाईप, २० किलो गरम सडवा, ७० किलो जळावू काड्या असा एकूण १ लाख ५० हजार ८०० रूपयांचा माल जप्त करून मुद्देमाल पकडण्यात आला.
या प्रकरणात निशाण सुरज गिरी, योगेश रामदास मेश्राम, सुरज काशी गिरी (सर्व रा. भजेपार) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस उपनिरक्षक अशोक केंद्रे, पोलीस शिपाई बिसेन यांनी केली आहे.