महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राला दिलासा, विशाखपट्टणमवरून 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' गोंदियात दाखल - गोंदिया न्यूज

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण आता विशाखापट्टणमवरून ऑक्सिजन आणण्यात आला आहे. यासाठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' ही रेल्वे विशाखापट्टणम येथे गेली होती. 94 तासानंतर ती रेल्वे महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

Gondia
Gondia

By

Published : Apr 23, 2021, 8:03 PM IST

गोंदिया - विशाखपट्टणमवरून ऑक्सिजन घेऊन आलेली रेल्वे गोंदिया येथे दाखल झाली आहे. या रेल्वेत ऑक्सिजनचे ७ कंटेनर आहेत. ही रेल्वे नागपूर, नाशिक, मुंबई याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणार आहे. ही ऑक्सिजन रेल्वे विशाखपट्टणमवरून निघाल्यानंतर तब्बल ९४ तासानंतर आज (२३ एप्रिल) सायंकाळी ५च्या सुमारास गोंदिया येथे दाखल झाली. या ७ टँकरपैकी तीन टँकर नागपुरात उतरणार असून उर्वरित टँकर नाशिकला उतरणार आहेत.

९४ तासानंतर 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' महाराष्ट्रात दाखल

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा दुर्देवी मृत्यू होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी, राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्राकडे मागणी केली होती. त्यानंतर ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. तब्बल ९४ तासानंतर ऑक्सिजन घेऊन ही एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात दाखल झाली आहे.

सोमावरी कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी ७ टँकर घेऊन विशाखापट्टणम स्टील प्लांट येथे दाखल झाली होती. रेल्वे प्रशासनाने मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचे ७ टँकर पुरवण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. एकूण ७ टँकरमध्ये १०० टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे. यासाठी विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी रोलिंग मिल्स परिसरात विशेष रेल्वे ट्रॅक बांधला होता.

७ ऑक्सिजन टँकरपैकी 3 टँकर नागपुरात उतरवण्यात येणार आहेत. त्यानंतर ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकला शनिवारी सकाळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये उर्वरित चार ऑक्सिजन टँकर उतरवण्यात येणार आहेत. त्यानंतर ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रिकामी पुन्हा कळंबोलीकडे रवाना होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details