गोंदिया- गेल्या काही दिवसांपासून वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा आजचा 12 वा दिवस आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे? हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे म्हटले. त्यामुळे या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय गाठले.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार उत्तराने गोंदियातील शिक्षकांचे आंदोलन चिघळले; शिक्षण विभागात तोडफोड - शिक्षकांना अटक
वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा 12 वा दिवस आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे? हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकारी यांनी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेऊ नये असे म्हटले.
शिक्षणाधिकारी यांच्यासोबत आंदोलकांचा वाद झाला. यावेळी येथील कार्यालयातील खुर्च्या, टेबलावरील काचेची आंदोलक शिक्षकांनी तोडफोड केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. याची तक्रार शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे केली. ग्रामीण पोलिसांनी सर्व आंदोलक महिला, पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.
आंदोलक शिक्षकांनी उग्ररुप धारण केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. सोमवारी या शिक्षकांनी अर्धनग्नावस्थेत जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.