गोंदिया- जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागाकडून हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या घेतल्यानंतर तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या तुषार राऊत (वय ८ वर्षे), या विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर डोके खूप दुखत असल्याने तो वर्गातच झोपला. मात्र, त्याला न उठवता शाळा बंद झाली. बराच वेळ शोधल्यानंतर तो वर्गातच सापडला आणि अखेर त्याच्या आई-वडिलांच्या जिवात जीव आला.
शाळा सुटली सगळे विद्यार्थी आपापल्या घरी निघून गेले. घरी जाण्याच्या गडबडीत शिक्षकाला तुषार वर्गात झोपल्याचा विसर पडला. त्यामुळे शिक्षकांनी वर्गाला बाहेरून कुलूप लावले. शाळा सुटूनही तुषार घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शाळा सुटल्याच्या तीन तासानंतर तुषार उठला. वर्गात कोणीच दिसत नसल्याने तो आरडा-ओरडा करू लागला. शाळेजवळ राहणाऱ्या नागरिकांनी त्याचा आवाज ऐकू आल्यांनी शाळेत धाव घेतली आणि तुषार वर्गातून बाहेर काढले. अखेर आई-वडिलांना तुषार भेटल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले असून संबंधित शिक्षकावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.