गोंदिया- जिल्ह्यात २५ मार्चपासून कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. मात्र, ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा उद्रेक पाहावयास मिळाला. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढले आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूदरातही मोठी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ४१७ वर पोहोचली आहे. बहुतांश कोरोनाग्रस्तांना श्वसनाचा त्रास उद्भवतो. यामुळे त्यांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज भासते. परिणामी, ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक साठा असल्याने ही स्थिती समाधानकारक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७७८ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर, १ हजार ५८८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे. जिल्ह्यात गोंदिया मेडिकल कॉलेजसह जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयात ४१० ऑक्सिजन खाटा तयार करण्यात आल्या असून प्रशासनाकडे ५२० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. त्यामधून दररोज ११० सिलिंडची आवश्यकता असते. सुमारे ४० रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच ६१० सिलिंडर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन साठवण्यासाठी टँक तयार करण्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. ते प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य भूषणकुमार रामटेके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. गोंदिया शासकीय रुग्णालयात जून व जुलै महिन्यांत २० ते ३० ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासत होती. मात्र, ती वाढत जाऊन ऑगस्ट महिन्यात ४० ते ४५ वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला गोंदियात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असले तरी गोंदियातील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही.
स्थानिक कंत्राटदाराकडून ऑक्सिजन सिलिंडर मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत आहेत. प्रत्येकी लहान सिलिंडर पुन्हा भरण्यासाठी १६५ रुपये देण्यात येत असून मोठे ऑक्सिजन सिलिंडरच्या पुर्नभरणासाठी २६५ रुपये देण्यात येत आहे. ११० ऑक्सिजन सिलिंडरसाठी दररोज २९ हजार १५० रुपयांचा खर्च येत आहे. सध्या गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा, केटीएस आणि अन्य शासकीय रूग्णालयात ४१० ऑक्सिजन खाटा तयार करण्यात आल्या आहेत.