गोंदिया -देशात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. यावर्षीच्या होळी सणावरही कोरोनाचे सावट होते. नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी पिंडकेपार येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी कोरोनाची होळी दहन केली. शाळा व्यवस्थापन समिती आणि शालेय प्रशासनाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी गावातील कचरा जमाकरून कोरोनाची प्रतिकात्मक होळी जाळून कोरोनाविषयी जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी केली कोरोनाची प्रतिकात्मक होळी - कोरोनाची होळी
गोंदिया जिल्ह्यातील पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोनाची होळी करुन जनजागृती केली. नागरिकांमधील कोरोनाची दहशत कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
हेही वाचा -पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर
पिंडकेपार येथील जिल्हा परिषद शाळेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. होळी या सणाचे औचित्य साधत येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि शालेय प्रशासनाने कोरोना या रोगाविषयी जनजागृती व्हावी, गावातील कचरा साफ व्हावा आणि पर्यावरणपुरक होळी साजरी व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी गावातील कचरा गोळा करून शाळेच्या आवारात आणला आणि त्यानंतर कोरोनाविषयी जनजागृतीचे फलक हातात घेवून घोषणा देत कोरोनाची होळी जाळली. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाबाबत जनजागृती होत नसताना, जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.