गोंदिया - जिल्हयाची धान उत्पादक जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच येथील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय जैविक शेती सर्टिफिकेट कोर्सची सुरुवात करण्यात आली. सेंद्रिय जैविक शेती केंद्र नागपूर भारत सरकार यांच्या माध्यमातून हा कोर्स सुरू करण्यात आला. यात प्रशिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांसाठी येथील प्रयोगशील शेतकरी महेंद्र ठाकूर यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली.
महेंद्र ठाकूर यांच्या सेंद्रिय शेतीच्या मालाला देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ठाकूर यांच्या शेताची निवड करण्यात आली. यावेळी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करायची, जैविक खते कशाप्रकारे तयार करायची इ. माहिती देण्यात आली. आजच्या युगात विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी तिकडे वळत असल्याचे दिसतात. मात्र, शेतीकडे आज कोणीही पाहत नाही. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे.