गोंदिया - आमगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या बनगावातील विद्यार्थ्यांना स्मशानभूमीतील झाडावर बसून ऑनलाईन शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. घरात मोबईल नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ही कसरत करावी लागत आहे. त्याचबोरबर, ज्या विद्यार्थ्यांना झाडावर चढता येत नाही, त्यांना झाडा खालीच बसून अभ्यास करावा लागत आहे.
माहिती देताना विद्यार्थी, विद्यार्थिनी हेही वाचा -गोंदियात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या गंभीर असल्याने विद्यार्थ्यांना स्मशानभूमीतील झाडावर बसून ऑनलाईन क्लासेस व अभ्यासक्रम पूर्ण करावे लागत आहे. हे झाडच त्यांच्यासाठी आता मोबाईल टॉवर झाले आहे. नेटवर्क मिळत नसल्याने या गावातील काही उच्च शिक्षित तरुणांनी टेलिफोन कंपन्यांकडे तक्रार केली. यावर कंपन्यांनी नल एरिया (खोलगट भागात असलेले गाव) मध्ये नेटवर्कची समस्या असल्याचे सांगितले.
मोक्षधाम समितीने केली व्यवस्था
स्मशानभूमी परिसरातील झाडांवर बसून विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस करीत असल्याने बनगाव येथील आमेशांती मोक्षधाम समितीने विद्यार्थ्यांसाठी हा परिसर स्वच्छ, सुंदर करून दिला आहे. या ठिकाणी बसण्याकरिता टेबलची सुद्धा व्यवस्था केली आहे. स्मशानभूमीत जाऊन कुणी अभ्यास करीत नाही, पण हे विद्यार्थी अंधश्रद्धेला थारा न देता नियमित स्मशानभूमीत जाऊन अभ्यास करीत असल्याचे चित्र पहायला मिळते. समितीतर्फे या परिसराची नियमित स्वच्छता करून परिसर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. विविध विकासकामे व वृक्षारोपण करून या परिसराला बागेचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे, परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन अभ्यास करतात.
मागील दिड वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अभ्यास केंद्र झाल्याचे चित्र आहे. पोलीस भरती, आर्मी भरती, बँक आणि शिक्षक भरती, अशा अनेक पदांसाठीच्या परीक्षेकरीता विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाची तयारी येथेच करतात. शासनाने समस्येकडे लक्ष द्यावे व त्याचे निवारण करावे, अशी मागणी गावकरी आणि विद्यार्थ्यांमधून होत आहे.
हेही वाचा -गोंदियात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन