गोंदिया - ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर वेतनवाढ झाले आहे. मात्र, असे असताना फक्त गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ झाले नाही. यासाठी कंत्राटी अभियंता, कर्मचारी यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांना वेतनवाढ देण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतेही ठोस प्रत्युत्तर न मिळाल्याने आज (सोमवार) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना, कंत्राटी अभियंता आणि कर्मचारी यांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली. तसेच मानधन वाढ करावी, अशी मागणी केली.
कमी पगार आणि मानधनात काम करणाऱ्या या कर्मचारी वर्गावर सध्या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांना त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा गोंदिया जिल्ह्यातील रोजगार हमी कामावर मोजमाप करणार नाही आणि कामबंद आंदोलन करू, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.