गोंदिया- देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, आजसुद्धा अनेक गावांत आजही वाहतुकीच्या सोईसुविधा न पोहचल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. असंच एक गाव आहे महाराष्ट्र राज्याच्या सुरुवातीच्या टोक समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह दंडारी हे गाव. आदिवासी बहुल नक्षल क्षेत्र, अशी या गावाची आजही ओळख आहे. मात्र, आजसुद्धा या गावात एसटी महामंडळाची बस तर सोडा, साधे काळे-पिवळे (वडाप) वाहनदेखील या गावात यायला तयार नाही. त्यामुळे या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांना १८ किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो.
हेही वाचा -Old man hit by bike : थरारक.. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटरसायकलने उडवले
मुरकुटडोह दंडारी गावची भौगोलिक माहिती -महाराष्ट्र राज्याच्या सुरुवातीच्या टोकावर वसलेल्या सालेकसा तालुक्याअंतर्गत येत असलेला. मुरकुटडोह दंडारी गाव, ह्या गावाची लोकसंख्या जवळपास ७०० च्या आत आहे. या गावाला लागून असलेले तीन राज्य सीमादेखील आहेत. त्यामध्ये या गावाला मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्र या तीन राज्यांची सीमा आहे. मात्र, हे गाव अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव असल्याने नक्षलांच्या भीतीमुळे या गावात रस्तादेखील बनलेला नव्हता. मात्र, २०१९ मध्ये या गावाला जाण्याकरिता जवळपास १४ कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता तयार करण्यात आला. मात्र, तरीदेखील या गावात बस येत नसल्याने गावकरी एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी करीत आहेत.