गोंदिया -मागील पाच वर्षात स्थानिक आमदारांनी गावाचा विकास केला नसल्याने जिल्ह्यातील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील सीतेपार या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकत शासनाचे लक्ष वेधले आहे. दोन दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने ही बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीची प्रशासनाने आणि मतदारसंघातील आमदारांनीही दखल घेत ग्रामस्थांची घेतली होती. परंतु ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे.
आमगाव तालुक्यातील सीतेपार या गावची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेनुसार २५०० चे आसपास आहे, तर आधीच या ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत निवेदन देत येत्या २१ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबत निवेदन दिले होते. तर स्थानिक प्रशासनाने देखील याच पाठपुरावा करीत समस्या मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, केवळ आश्वासनावर अवलंबून न राहता काही तरी ठोस पाऊले प्रशासनाने उचलावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.