गोंदिया - येत्या २३ ऑगस्ट पासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरुवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मूर्तिकार आपले बस्तान मांडतात. यंदाही त्यांचे आगमन झाले असून आत्तापासूनच मूर्ती बनविण्यास सुरुवात केल्याचेही दिसून येत आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बाजारात विक्रीला आल्याने मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या या मूर्तिकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.
मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांच्या व्यवसायावर परिणाम
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तिकार येत असून यंदाही मूर्तिकारांचे आगमन होत असल्याचे दिसत आहे. हनुमान चौकपासून या मूर्तिकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात. त्यानुसार यंदाही मूर्तिकारांचे परिवार आपापल्या ठिकाणांवर आले असून त्यांचे काम सुरू झाले आहे.
हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मूर्ती पूजेलाही तेवढाच मान आहे. यंदा २३ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असून तेव्हापासून मूर्ती पूजनाचे सण सुरू होत आहेत. २ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाबाई, लक्ष्मीपूजनसारखे सण येतील. त्यामुळे हे मूर्तिकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली असल्याचेही दिसत आहे.
मोठ्या संख्येत मूर्तिकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते इंगळे चौक या परिसरात दुकाने थाटुन व्यवसाय करतात. मात्र, जेव्हापासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बाजार यायला लागल्या तेव्हापासून मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराच्या उदरनिर्वाहावरही मोठा फरक पडत आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींमुळे जल प्रदूषण तर होतेच, सोबतच मूर्तिकारचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे मूर्तिकार बोलत आहेत.