गोंदिया - कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यातीलही सर्वच शाळा-महाविद्यालये बंद झाली. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. या ऑनलाईन शिक्षणप्रणालीला प्रतिसादही मिळू लागला. मात्र, पायाभूत सुविधांची आणि तंत्रज्ञानाची वानवा असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळा बंद झाल्याने रखडला.
ग्रामीण भागातील अनेक मुलांच्या पालकांकडे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी अॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा लॅपटाॅप्स नाहीत. ज्यांच्याकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांच्याकडेही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. असे विद्यार्थी शाळेपासून दुरावले तर, त्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणणे अतिशय अवघड होईल. यासाठी गोंदिया येथील एन. एम. डी. कॉलेजमधले प्रा. बबन मेश्राम यांनी ग्रामीण भागातील मुलांचा शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष शक्कल लढवली. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) आजी-माजी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांची टीम तयार केली.