गोंदिया- कित्येकदा निराधार व्यक्तीचे जीवन अतिशय कठीण परिस्थितीत जात असल्याचे दृश्य आपणास पाहायला मिळतात. त्यामध्ये कधी रस्त्यावर भिख मागून जगणारे भिखारी, तर कधी मानसिक आजाराने बेघर झालेले रुग्ण, तर मुलांनी सांभाळ न केल्याने एकट्यानेच हाल अपेष्टामध्ये जीवन जगणारे वृद्ध नागरिकांचीही यामध्ये समावेश असतो. गोंदिया शहर व जिल्ह्यात देखील अशा कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या समाज घटकास ‘सावली’ या निराधार केंद्राने आधार दिला आहे.
ज्या वृध्दांना स्वत:च्या मुलांनी म्हातारपणी त्यांची काठी न होता नाकारून घरातून हाकलले, तेव्हा अशा वृध्द, भिकारी, बेघर, निराधारांसाठी गोंदियातील ‘सावली’ केंद्र मदतीला धावून येत आहे. या केंद्रातील कर्मचारी भिकारी, निराधारांच्या शोधात असतात. आतापर्यंत ‘सावली’ ने हजारो निराधारांना अन्न, वस्त्र, निवाराच नव्हे तर, रोजगार, आरोग्य, मृतांवर आपल्या कुटुबीयांप्रमाणे अंत्यसंस्कार सुधा केले आहेत. सावलीच्या या सामाजिक उपक्रमाचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेश आढावा.
बेघरांना आश्रयाची सावली-
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा...’ हा अंभग सर्वच ऐकतात. मात्र, याचा प्रत्यक्ष जीवनात फार कमीपणा अवलंब करतात. आपण कुत्र्या-मांजरांचेही लाड करतो, त्यांची काळजी घेतो; पण त्यांना मिळतो तसा साधा तुकडाही ज्यांच्या वाट्याला येत नाही. अशी परिस्थिती आढळून येते ती रस्त्याच्या कडेला भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांकडे पाहिल्यानंतर, यांना एकवेळचे अन्नही मिळणे मुश्कील होत असल्याचे चित्र समाजात अनेकवेळा पाहायला मिळते. यामध्ये कोणी परिस्थिती हतबल होऊन, तर कोणी शाररिक व्याधीने समाजातून नाकारला जाऊन, तर कोणी दुर्दैवाने पोटच्या मुलांनी घरातून बाहेर काढल्याने किंवा सांभाळ करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर ही उपासमारीची आणि पर्यायाने भीक मागायची वेळ येऊन ठेपते. त्यातून त्यांचे जगणे असह्य होते.