गोंदिया -कडीकसा गावातील १३ शेतकऱ्यांच्या भातपिकांच्या गंजी जाळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शेतातील भातपिकाच्या सुरक्षिततेसाठी पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकांची कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी भातपिकांची कापणी करून मळणीसाठी त्याच्या गंजी तयार केल्या आहे. मात्र, २७ नोव्हेंबरला चिचगडसह ६ गावातील ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या भातपिकांच्या ८० गंजी जाळल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे पंचनामे सुरू असताना पुन्हा चिचगडपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कडीकसा गावातील १३ शेतकऱ्यांच्या गंजी जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गंजी संपूर्ण जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.