गोंदिया - तिरोडा शहरात मोठ्या प्रमाणात मोहफुलांच्या अवैध दारूचा व्यवसाय होत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासूनच छापासत्र कारवाई राबविणे सुरू केले आहे. आज २६ डिसेंबरला त्यांनी आपल्या पोलीस पथकांसह शहरातील संत रविदास वॉर्डात येथे अवैध दारूच्या ६ अड्ड्यांवर छापा घालून ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, जागेवरच हा माल जाळून नष्ट करण्यात आला.
मोहफुलांची अवैध दारू
तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डात काही लोक मोहफुलांची अवैध दारू बाळगत आहेत. तसेच सडवा रसायन सुद्धा भिजत घातलेला आहे, अशी माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून आज २६ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांची वेगवेगळी एकूण ६ पथके तयार करून ६ अवैध दारू अड्ड्यांवर छापा घालण्यात आला. यात १३ हजार रुपये किंमतीची १३० लीटर मोहफुलांची दारू, ८ लाख रुपये किंमतीची प्लास्टिकच्या एकूण ५०० पोत्यांमध्ये प्रत्येकी २० किलोप्रमाणे १० हजार किलो दारू गाळण्याकरिता भिजत घातलेला सडवा, मोहफूले, रसायन असा एकूण ८ लाख १३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तो जागेवरच जाळून नष्ट करण्यात आला.
हेही वाचा -खोट्या सह्यांद्वारे केली ३ कोटी ६० लाखांची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल