गोंदिया - गणपती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशी समाप्त झाल्यानंतर पितृमोक्ष पंधरवाडा सुरू होतो. पितृमोक्ष अमावस्या झाल्यावर घटस्थापनेला सुरुवात होत असते. यावर्षी अश्विन मासारंभ शारदीय नवरात्र २९ सप्टेंबरपासून होणार आहे. याच दिवशी देवीचे भक्त घटस्थापना करतात. त्यानिमित्ताने देवीदेवतांच्या मंदिराच्या रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देवी भक्तांना आता नवरात्रीचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी गोंदियात देवीच्या मूर्ती बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यंदा जवळपास एक हजार मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. गोंदियात गणेश मूर्ती तयार करणारे कारागीर मोठ्या संख्येने आहेत. २५ पेक्षा अधिक ठिकाणी मूर्ती तयार करणारे दाखल झाले आहेत. या ठिकाणी हजारो मूर्ती तयार होतात.
गणेशोत्सव संपल्यानंतर मूर्तीकारांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. अर्थात काही मोजकेच कारागीर देवीच्या मूर्ती तयार करीत असतात. तरीही जवळपास आठशे ते हजार मूर्ती शहरातून तयार होऊन विक्रीसाठी जातात. सध्या शहरातील पाच ते सात कारागीर त्यासाठी मेहनत घेत आहेत. अवघ्या दोन फुटांपासुन सात ते १५ फुटपर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात येत असतात. येत्या दोन दिवसात रंग काम पूर्ण होणार व मूर्ती तयारही होणार असल्याचे कारागिरांनी सांगितले. गोंदियासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दोनशे मूर्ती अधिक तयार करण्यात आल्या आहेत.