गोंदिया- आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण व जनजागृती या आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्तीच्या काळात जनजागृती आणि दक्षता या शस्त्रांचा वापर करून पूर परिस्थिती आणि कोरोनावर मात करता येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पूर परिस्थतीत शोध व बचावकार्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांची उपस्थिती होती.
राज्य आपत्ती दल, नागपूर तुकडी क्र.1 चे टिम कमांडर प्र. सहाय्यक समादेश सुरेश कराळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस उपनिरिक्षक अजय काळसरपे, तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता.
यावर्षी जिल्हा प्रशासनासमोर कोरोना आजार तसेच पूर परिस्थिती, असे दोन महत्वाचे आव्हान आहेत. या दोन्ही समस्याना तोंड देण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन कार्य करावे लागेल. शोध व बचाव कामात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाच्या रंगीत तालिमचा वापर पुढील काळात येणाऱ्या आपत्तीवर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. यावर्षी जिल्ह्यातील जलाशये, धरणे व इतर ठिकाणी पाण्याचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पूर परिस्थीतीचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे त्यांनी सांगितले.